समाजाच्या शाश्वत विकासासाठी विज्ञान तंत्रज्ञानाची आवश्यकता असून सामाजिक बांधिलकी जोपासत विज्ञानाची कास धरायला हवी. गरीब परिस्थिती हा शिक्षणातील अडथला न ठरता तो शिक्षणाच्या उन्नतीचा मार्ग ठरायला हवा. यासाठी विद्यार्थानो भारतरत्न डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा असा कानमंत्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी विद्यार्थांना दिला. ठाणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने ४५ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सिम्बोयसिस हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, कौसा,शिळ येथे भरविण्यात आले आहे. बुधवारी या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या हस्ते आज संपन्न झाले. त्यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी उपाध्यक्ष सुभाष पवार, जिल्हा परिषद शिक्षण समिती सदस्य रेखा कंटे, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, कॉलेजचे संचालक कमलराज देव, प्राचार्य स्नेहलता देव आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार म्हणाले की, अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनातून देशाचे भावी शास्त्रज्ञ घडत असतात. त्यामुळे विद्यार्थाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी असे उपक्रम महत्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या प्रदर्शनाला जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिक्षणाधिकारी शेषराव बडे, जिल्हा परिषद सदस्य रेखा कंटे यांनी समायोचीत मनोगत व्यक्त केले.
४५ व्या ठाणे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न