बँकांच्या देशव्यापी संपात रत्नागिरीतील सर्व कर्मचारी सहभागी

बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी संपात रत्नागिरीतील बँकांचे कामकाज शुकवारी बंद राहिल्याने नागरिकांचे आर्थिक व्यवहार कोलमडले. वाजवी वेतनवाढ मि विी व सेवा- शर्तीमध्ये सुधारणा कराव्यात या मागण्यांसाठी बँक कर्मर्चाऱ्यांनी हा देशव्यापी संप पुकारला असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन दिवसांच्या संपानंतर जर आयबीएने पुढाकार घेऊन वेतनवाढीचा ११ वा करार संपन्न केला नाही तर ११ ते १३ मार्च असा तीन दिवस व १ एप्रिल २०२० पासून बेमुदत संप करण्यात येईल असे संघटना प्रतिनिधींनी जाहीर केले. रत्नागिरीमध्ये संपकरी बँक कर्मचारी व अधिकारी यांनी सकाळी बँक ऑफ महाराष्ट्रसमोर गाडीतळ येथे एकत्रित येऊन आपला संताप व्यक्त करणारी जोरदार निदर्शने केली. निदर्शनांचे नेतृत्व व संपकरी कर्मचारयांना मार्गदर्शन राजेंद्र गडवी, विनोद आठवले विनोद कदम, विश्वनाथ आडारकर व संतोष कुलकर्णी यांनी केले. रत्नागिरीत बँक कर्मचाऱ्यांचा आज संपाचा पहिला दिवस पूर्णत यशस्वी झाल्याचा दावा कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधींनी केला आहे. बँकींग उद्योगातील शिखर संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या नऊच्या नऊ संघटनांनी या संपामध्ये भाग घेतला होता. देशभरात सुमारे १० लाख तर महाराष्ट्र राज्यात जवळपास ४० हजार बँक कर्मचारी व अधिकारी या संपामध्ये सहभागी झाले होते. २७ महिने प्रलंबित असलेला बँक कर्मचारयांचा वेतनवाढीचा ११ वा द्विपक्ष करार त्वरीत संपन्न करा ही प्रमुख मागणी या संपात आयबीएकडे करण्यात आली आहे. संपाच्या एक दिवस आधी म्हणजे ३० जानेवारीला झालेल्या वाटाघाटीही निष्फळ ठरल्या. पुन्हा एकदा असमाधानकारक वेतनवाढीचा प्रस्ताव आयबीएने दिला आहे. त्यामुळे बँक कर्मचारी संघटनांना नाईलाजाने हा संप करावा लागत आहे.